advertisement
रावणहत्ता हे वाद्य म्हणे रावणाने स्वतःच्या हाताच्या नसांनी बनवलं होतं. खरं खोटं रावण जाणे. पण देवाला प्रसन्न करवून घेण्यासाठी असं काहीतरी हटके करावं लागतं ही शिकवण महत्त्वाची. बाकी काही असो पण पूर्वीचे लोक भारी होते काहीतरी भन्नाट डोकं वापरून देवाला खूष करायचे. देवसुद्धा खूष होऊन हसत हसत भक्तासमोर यायचा. तो मागेल ते त्याला द्यायचा. हीच संस्कृती पुढे जाऊन कॉ र्पोरेट कल्चर बनली असा विचार काही थोर मंडळी करतात. असो. वरील शिकवण घेत असताना काही लॉजिकल प्रश्न निर्माण होतात. ते असे की जर हाताच्या नसा गेल्या तर मग तो हात पुढे वापरता येऊ शकतो का? त्या हातात तेवढी शक्ती उरेल काय? रावणाचा तो हात निकामी झाला का? देव प्रसन्न झाल्यावर रावणाने वर म्हणून जे काही मागितलं ते त्याला मिळालं असेलच, पण त्यासोबत बायडिफॉल्ट-वर म्हणून हाताच्या त्या नसा देवाने त्याला परत केल्या असतील काय? जर का शेवटच्या प्रश्नाचं उत्तर होय असं असेल तर मग आधीचे प्रश्न मिटलेच. पण जर उत्तर नकारार्थी असेल तर मग पुढे काय? रावण तसाच लढला का रामाशी? तसं असेल तर मग रामाने रडीचा डाव खेळला असंच म्हटलं पाहिजे. असो. रामायण अभ्यासकांनी कृपया यावर प्रकाश टाकावा.
रावण म्हणजे राक्षस, भूतं वगैरे अवली जीवांचा राजा. हे भूत, राक्षसं, पिशाच्च, हडळी, जख्खीणी, मु्ंज्या, समंध वगैरे मंडळींचं कॅरेक्टरायझेशन जबरदस्त आहे. ज्याच्या कुणाच्या डोक्यातून ही कल्पना निघाली त्याला "नरकरत्न" पुरस्कार दिला गेला पाहिजे. "भूतं म्हणजे एखाद्याने केलेल्या पापांमधून तयार झालेली नकारात्मक ऊर्जा" अशी व्याख्याही आहे म्हणे. याचा अर्थ भूतं हा विषय भौतिकशास्त्रात शिकवला गेला पाहिजे. भौतिकशास्त्र म्हणजे भवतालचं शास्त्र असा एक गैरसमज लहानपणी होता. त्यालाच छेद देणारा दुसरा गैरसमज म्हणजे भवताल हा त्रिताल, झपताल, एकताल यांच्याच पंगतीतला एक ताल असावा असंही वाटायचं. वाटण्याला काही मर्यादा नसतात हो. लहानपणी काय वाट्टेल ते वाटायचं. अगदी आत्तासुद्धा कुणालाही काहीही वाटू शकतं. आणि तसं ते वाटू द्यावं. ह्या अशा अमर्याद वाटण्यामुळेच असामान्य कलाकृती घडत असतात म्हणे. एकूणच साहित्याचे जे काही प्रकार आहेत त्यामध्ये "काहीही" हा एक प्रकार समाविष्ट व्हावा यासाठी एक मोठी चळवळ उभी करणं गरजेचं आहे. ज्यामध्ये अशा कलाकृतींना स्थान मिळेल. ललित, कविता, कथा, कादंब-या, आत्मचरित्र वगैरे प्रकारांसोबतच काहीही या साहित्यप्रकाराचा वाचकवर्ग मोठा आहे. आणि तो दिसामासी (हा शब्द क्वचितच वापरला जातो) वृद्धिंगत (हाही शब्द फारसा वापरला जात नाही) होत चालला आहे. काहीही या वर्गात अगदी नवजात बालकाच्या साहित्यापासून ते शेवटचे श्वास घेणा-या पांढरकेशांच्या साहित्यापर्यंत कशाचाही अंतर्भाव (हा शब्द ब-यापैकी वापरला जातो) होऊ शकतो.
असो. तर भुतं हा उर्जेचाच एक प्रकार आहे. आणि लॉ ऑफ कॉन्झर्व्हेशन ऑफ एनर्जीनुसार एका ऊर्जेचं दुस-या ऊर्जेत रूपांतर होऊ शकतं, ऊर्जा संपत वगैरे नाही हे भुतांनाही लागू होऊ शकतं. याचा अर्थ एका भुताचं दुस-या भुतात रूपांतर होतं असं नाही. तर माणसाचं, प्राण्यांचं, जीवाणू-विषाणूंचं भूत होतं आणि भुताचा पुन्हा माणूस, प्राणी, जीवाणू-विषाणू. (माणूस-भूत-प्राणी, प्राणी-भूत-माणूस, जीवाणू-भूत-माणूस, प्राणी-भूत-विषाणू ह्या आणि अशा साखळ्या शक्य आहेत.) हे दुसरं-तिसरं काहीही नसून लॉ ऑफ कॉन्झर्व्हेशन ऑफ एनर्जीच आहे. हा ऊर्जेचा जो काही थोर नियम आहे त्याच्या खोलात गेलं तर मग पुनर्जन्माचं कोडंसुद्धा सुटेल. (ही एक नवीन थिअरी लेखकाने याटिकानी मांडलेली आहे. या थिअरीला लेखकाने झेंडा-पेंढा-मेंढा थिअरी असं नाव दिलेलं आहे. हे नाव याआधी कुणीच वापरलेलं नाही त्यामुळे प्रचलित व्हायला सोपं जाईल.)
या थिअरीच्या आधारे पुनर्जन्म झालाच तर तेव्हा माणूस न होता गेंडा व्हावं यासाठी देवाला प्रसन्न करून घेण्यात येणार आहे. गेंडा हा जबरदस्त चतुष्पाद आहे. बलवान, शक्तीमान, ताकदवान असूनही त्याचा फालतू माज मारत नाही. जंगलातल्या कुरणामध्ये संथगतीने गवत खात असतो. आपलं काम करावं आणि बाजूला व्हावं ही त्याची साधी रीत. ताशी सदतीस सेंटिमीटर या वेगाने चालूनही त्याच्या आयुष्यात काहीही प्रॉब्लेम्स नसतात. "उशीरा का आला?" असा सवाल त्याला कुणी करत नाही. वाघ, सिंह, बिबळ्या, चित्ते वगैरे नरभक्षक प्राणी गेंड्याच्या वाटेला जात नाहीत. अहो इतके शूरवीर असूनही गेंड्याची कातडी (उगीच काही लोकांची नावं आली डोक्यात) काही त्यांना फाडता येत नाही. हत्ती-गेड्यांची झुंजसुद्धा दुर्मिळच. लहान मुलांना जसं दात नीट आणि निरोगी यावेत यासाठी रबर चावायला देतात तसं जंगलातले प्राणी त्यांच्या लहानग्यांना गेंड्याच्या मांड्या चावायला देतात. गेंडासुद्धा त्याला काहीही आक्षेप नोंदवत नाही. तो निवांत गवत खात असतो. कसली घाई नाही, फुकाची धावपळ नाही, कुणीतरी झडप घालतंय या भीतीने सतत कान टवकारणं नाही, दचकणं नाही, आहे शिंग म्हणून उगीचच ह्याला मार त्याला मार असला प्रकार नाही, शक्ती आहे म्हणून दे धडक वगैरे चावटपणा नाही. सारं कसं फुरसतीत, आरामात, सुशेगाद, रविवारसारखं. आयुष्यात काही त्रासच नाही. जगावं तर गेंड्यासारखं.
हे असं आयुष्य लाभावं म्हणून देवाला प्रसन्न करण्यासाठी एखाद्या हटके, भन्नाट तपश्चर्येचा पर्याय सुचवावा. वर मागताना पर्याय सुचवणा-यांसाठी काही टक्के बाजूला ठेवले जातील.
पुष्कर सामंत
(यह लेख पुष्कर सामंत ने क्विंट को स्वतंत्रता दिवस कैंपेन के लिए भेजा है, बोल - अपनी भाषा से प्यार करें.)
[ क्या आप अपनी मातृभाषा से प्यार करते हैं? इस स्वतंत्रता दिवस पर द क्विंट को बताएं कि आप अपनी भाषा से क्यों और किस तरह प्यार करते हैं. आप जीत सकते हैं BOL टी-शर्ट. आपको अपनी भाषा में गाने, लिखने या कविता सुनाने का मौका मिल रहा है. अपने BOL को bol@thequint.com पर भेजें या 9910181818 नंबर पर WhatsApp करें.]
(क्विंट हिन्दी, हर मुद्दे पर बनता आपकी आवाज, करता है सवाल. आज ही मेंबर बनें और हमारी पत्रकारिता को आकार देने में सक्रिय भूमिका निभाएं.)